शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

गाथा अभंग ११

वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥१॥

अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ध्रु.॥

अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥२॥

जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥३॥

गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥४॥

तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥५॥

अर्थ :- त्यांची  चरणवंदना करुण, त्यांचे उष्टे सेवन करू; त्यामुळे आपल्या पूर्व कर्मचि होळी होईल ।।1।।

हे ज्ञानभक्तिचे भांडवल पदरी बांधून, विठ्ठलास वश करुण घेऊ ।।ध्रु।।

गोविंदाचे केवळ नामस्मरणान व् चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील ।।2।।

जन्ममृत्युच्या एरझारया संपतील आणि संत सहवासाने हां जन्म सार्थकी लागेल ।।3।।

पुढे गेलेल्या संतसजनांच्या मार्गाने शोध करीत त्यांच्या मार्गाने आपण त्यांचा माग घेत पुढे जाऊ ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात की, या मार्गाने गेलो असता मोक्षरुपी माहेराचा लाभ होईल ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा