४२५
देखत होतों आधीं । मागें पुढें सकळ । मग हे दृष्टी गेली । वरी आले पडळ ।
तिमिर कोंदलेंसें । वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालों देवा । काय ज्याल्याचें फळ ॥१॥
आतां मज दृष्टी देई । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारूनियां पापा ।
अंजन लेववुनी । करीं मारग सोपा । जाईन सिद्धिपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥ध्रु.॥
होतसे खेद चित्ता । कांहीं नाठवे विचार । जात होतों जना । मागें तोही सांडिला आधार ।
हा ना तोसा ठाव जाला । अवघा पडिला अंधार । फिरलीं माझीं मज । कोणी न देती आधार ॥२॥
जोंवरि चळण गा । तोंवरि म्हणती माझा । मानिती लहान थोर देहसुखाच्या काजा । इंद्रियें मावळलीं ।
आला बागुल आजा । कैसा विपरीत जाला । तो चि देह नव्हे दुजा ॥३॥
गुंतलों या संसारें । कैसा झालोंसें अंध । मी माझें वाढवुनी । मायातृष्णेचा बाध।
स्वहित न दिसेचि । केला आपुला वध । लागले काळ पाठीं । सवें काम हे क्रोध ॥४॥
लागती चालतां गा । गुणदोषाच्या ठेंसा । सांडिली वाट मग । जालों निराळा कैसा ।
पाहातों वास तुझी । थोरी करूनी आशा । तुका म्हणे वैद्यराजा । पंढरीच्या निवासा ॥५॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा