गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४३१गेले टळले पाहार तीन

४३१
गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अझून ।

जागे होउनि करा कांहीं दान । नका ऐकोनि झाकों लोचन गा ॥१॥

हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसें जना ।

चिपळ्या टाळ हातीं मुखीं घोष । नारायणा गा ॥ध्रु.॥

जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय ।

द्या परी मीस घेऊं नका भाई । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥२॥

देवाकारणें भाव तस्मात । द्यावें न लगे फारसें वित्त।

जालें एक चित्त तरी बहुत । तेवढ्यासाठीं नका करूं वाताहात गा ॥३॥

आलों येथवरी बहु सायासें । करितां दान हें चि मागावयास ।

नका भार घेऊं करूं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥४॥

आतां मागुता येईल फेरा । हें तों घडे या नगरा ।

म्हणे तुकयाबंधु धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥५॥

भावार्थ :-   आयुष्यातील तीन प्रहर संपले. पहिला गर्भवासाचा, दुसरा बालपणाचा व तिसरा तरुणपणाचा.  अज्ञानरूपी रात्रीचे ते तीन प्रहार जाऊन आता चौथा, वृद्धपणाचा प्रहर सुरु झाला आहे. अजूनही तुम्ही सावध का होत नाही ? सावध होऊन काहीतरी दान करा. डोळे झाकून बसू नका ॥१॥

मी वासुदेव “रामकृष्णहरी’ हे भजन करा असे लोकाना संगत आहे. आणि हातात विना, टाळ, चिपळ्या घुन मुखाने नारायणाच्या नामाचा घोष करत आहे ॥ध्रु.॥

फळ, फुल पाणी याहून अधिक काही मिळेल ते देवाला अर्पण करा. झोपेचे सोंग घेऊन निजू नका; कारण फसवणूक केली तर तुमचे कल्याण होणार नाही ॥२॥

देवाला धन-संपत्तीचा मोह नाही, तो तर भावाचा भुकेला आहे आपला श्रद्धाभाव त्याच्या चरणी अर्पण करा. ते त्याला आवडते. तुम्ही तुमची वाताहात करून घेऊ नका ॥३॥

मी मोठ्या कष्टाने, सायासाने तुमच्याकडे हे दान मागण्यासाठी आलो आहे. आता माझी निराशा करून, संसाराचा भार वागवीत बसू नका. प्रपंचात धर्म केला तरच त्याचे सार्थक आहे ॥४॥

तुकाराम महाराज म्हणतात,  आता पुन्हा या मनुष्य-जन्माला फेरा येईलच असे नाही; म्हणून मणी भाव धरा. देवाची ओळख करून घ्यायला जर चुकालात, तर नरकवास भोगावा लागेल ॥५॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा