गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४३३बोल बोले अबोलणे

४३३

बोल बोले अबोलणे । जागें बाहेर आंत निजेलें । कैसें घरांत घरकुल केलें । नेणों आंधार ना उजेडलें गा ॥१॥

वासुदेव करितों फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी कांहीं तरी दान करा । जाब नेदा तरी जातों सामोरा गा ॥ध्रु.॥

हातीं टाळ दिंडी मुखीं गाणें । गजर होतो बहु मोठ्यानें । नाहीं निवडिलीं थोरलाहानें । नका निजों भिकेच्या भेणें गा ॥२॥

मी वासुदेव तत्वता । कळों येईल विचारितां । आहे ठाउका सभाग्या संतां । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥३॥

काय जागाचि निजलासी । सुनें जागोन दारापासीं । तुझ्या हितापाठीं करी व्यास व्यासी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥४॥

ऐसें जागविलें अवघें जन । होतें संचित तींहीं केलें दान । तुका म्हणे दुबळीं कोणकोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥५॥

भावार्थ :-  ब्रह्म हा बोलण्याचा विषय नाही; तरी त शब्दज्ञानी त्याबद्दल बोलतात. बाहेरून ते जागे दिसत असले तरी आत निद्रिस्त आहेत. घरात त्यांनी ऐक घरकुल करून घेतले आहे. अंधार उजेड त्यांना कळत नाही ॥१॥

हा वासुदेव तुमच्या देहरूपी वाड्यात, तसेच ब्रह्मइंद्रियांत शिरून तुम्हाला प्रमार्थाबाबत जागे करीत आहे. या वासुदेवाला दान दया. मला प्रतिसाद देत नसाल तर मी माघारी फिरतो ॥ध्रु.॥

माझ्या हातात टाळ, विना आहे . मुखाने मी हरिनाम गात आहे. त्याचा मोठा गजर होत आहे. या वासुदेवाच्या चित्तात लहान-थोर असा भेदभाव नाही. दान द्यावे लागेल म्हणुन तुम्ही झोपेचे सोंग घेऊ नका ॥२॥

तत्वत: मी वासुदेव आहे. तुम्ही व्हीचार केलात तर ते तुम्हालाही करून येईल. भाग्यवंत अशा संताना माहीत आहे. माझ्याशिवाय दान मागणारा असा कुणीही नाही ॥३॥

मी आलो म्हणून तू झोपेचे सोंग घेतोस. दाराजवळ भुंकणारे कुत्रे ठेवतोस! तुज्या पारमार्थिक कल्याणासाठी मी हे बोलत आहे; पण तू वासुदेवाला भेटत नाहीस ॥४॥

तुकाराम महाराज म्हणतात,  सर्व लोकाना मी अश्या रीतीने जागे केले आहे. ज्यांचे नशीब चांगले होते, त्यांनी मला दान दिले. जे दुर्बल होते ते मला विसरून गेले ॥५॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा