गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४५८मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें

४५८

मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥१॥

ऐका बाई लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानीं उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ध्रु.॥

न बोलतां करी चिंता न मारिता पळे । दादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥२॥

देखत आंध बहिर कानीं बोल बोलतां मुकें । तुका म्हणे पतन सोयरीं ऐसीं जालीं एकें ॥३॥

अर्थ :- हा प्रापंचिक सौरी ( संसारी स्त्री ) दोराने बांधून न ठेवताच गुंतली आहे. डोक्यावर ओझे नसताना मोकळी असताना कुंथून, कण्हत आहे. देहरूपी वाड्याच्या खोड्यात आपल्या भावानुसार गुंतली आहे  ॥१॥

 

बायांनो, ऐका ! हि मुळात सुसंस्कृत, चांगल्या घराण्यातील स्त्री आहे. जी स्त्री आपल्या पतीची सेवा करते, ती उच्चस्तानी व समाधानी असते. अशा थोर स्त्रीला पाहून तुम्हाला लाज वाटत नाही काय ? ॥ध्रु.॥

 

कोणी काहीही बोलत नाही तरी हि सौरिणी स्त्री उगीचच चिंता करीत बसते. मारत नाही तरी पळून जाते. सुखरूपी हरी ह्र्द्यरुपी माहालात तिच्या शेजारी झोपलेला असतांना तो तिला आवडत नाही. चे सारे चाळे विषयाशी शिंदाळकी करण्याचे, जगझोडीचेच हललेले असतात ॥२॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, हिला दृष्टी असूनही हरीचे रूप पाहताना हि आंधळी झाली आहे. कान असून बहिरी, तोंड असून मुकी झाली आहे. हरिभक्ती न करणार्या सौर्याचे अध:पतन झाले आहे ॥३॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा