गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४२८भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी

४२८

भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी ।

न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥

विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥ध्रु.॥

भक्तिमुक्ति तूं चि एक होसि सिद्धीचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता ।

सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येउनि सामोरा आतां ॥२॥

संसारसागरू गा भवदुःखाचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ ।

इंयें वज्रघातें तपे उष्ण वरी जाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ॥३॥

तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरि खोडा भाव धरूनि टेंका ।

जाणवी नरनारी जागो धरम लोकां । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥४॥

नाठवे आपपर आतां काय बा करूं । सारिखा सोइसवा हारपला विचारू ।

घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥५॥
 

भावार्थ :- हे देवा, तुझी भेट होत नाही म्हणजे तुझ्यासाठी जिवंत असून मी मेल्यासारखा आहे. माझी बुद्धी निष्काम झाली आहे. पर्यायाने हात-पाय चालत नाही. नाशिवंत रुपाने व्यापक व अक्षर रुपाने अलिप्त असणार्या भगवंता, तुला आम्ही जाणत नाही. आम्ही ते पाहत नाही. देवा, माझी दृष्टी फिरेली आहे ॥१॥

विठ्ठला तुज्या कीर्तीची प्रभा अमर्याद आहे. तुज्या नामाचेच दान मला डे ॥ध्रु.॥

भगवंता, उक्ती-मुक्ती-सिद्धी यांचा तू दाता आहेस, म्हणून मी शोक, भय, लज्जा, चिंता सोडून दिली. सर्वस्वाचा त्याग करून मी तुज्याकडे धाव घेतली. तरी देवा, माझ्यासमोर येऊन मला कृपादान दे ॥२॥

हा संसारसागर म्हणजे भवदु:खाचे मुल आहे. लोकांचे बोलणे हे इंगल्याचे अंथरून आहे. इंद्रिये वज्रासारखी अघात करतात आणि उष्ण ज्वालांचा भडका होत आहे, असे भयंकर पीडादायक त्रास मी सहन केले आहे. देवा, मी काय करू? ॥३॥

वृक्षाच्या फांद्या जसे पान वागवीत तसा तुझा नामाचा व्याप तिन्ही लोकी पसरला आहे. भावाचा आधार अश्या या खोडाला मी चीटकलो आहे. व तेथून सर्व स्त्री-पुरुषांना जाणीव करून देत आहे, कि हा धरम समाजात जगावा, जे पुण्यवंत आहेत, ते आमच्या हाकेला प्रतिसाद देऊन आमच्याकडे येतात ॥४॥

तुकाराम महाराज म्हणतात,  मला आता आपले परके काही आठवत नाही.  त्याला मी काय करू ? प्रपंचाचा विचार संपला, माझा भार आता तुझ्यावर आहे. तुला मी शरण आलो आहे. मला अभय दे ॥५॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा