गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४३४रामकृष्ण गीती गात

४३४

रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळ्या वाजवीत । छंदें आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥१॥

जनीं वनीं हा अवघा देव । वासनेचा हा पुसावा ठाव । मग वोळगती वासुदेव । ऐसा मनीं वसूं द्यावा भाव गा ॥ध्रु.॥

निज दासाची थोर आवडी । वासुदेवासि लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडीं । ऐसी करा हे वासुदेवजोडी गा ॥२॥

अवघा सारूनि सेवट जाला । प्रयत्न न चले कांहीं केला । जागा होई सांडुनि झोपेला । दान देई वासुदेवालागा ॥३॥

तुका म्हणे रे धन्य त्याचें जिणें । जींहीं घातलें वासुदेवा दान । त्याला न लगे येणें जाणें । जालें वासुदेवीं राहणे गा ॥४॥

भावार्थ :-   रामकृष्ण या मंत्राचे गीत गात व ऐका हातात टाळ व दुसर्या हाताने चिपळ्या वाजवीत, छंद तालावर नाचत, आत्मतत्व बरोबर घेऊन हा वासुदेव सर्वत्र फिरत आहे ॥१॥

तो संगत आहे कि, परमेश्वर सर्वव्यापी आहे. वासनेचे मूळ उपटून नंतर वासुदेवाची सेवा करावी, असाच भाव तुमच्या नामात असू द्यावा ॥ध्रु.॥

वासुदेवाला लोकांना आत्मज्ञानाचे दान (नामाचे दान ) करण्याची खूप आवड आहे. म्हणून दर वेळी नामोच्चार करीत तो फिरत आहे. तुम्ही वासुदेवाला मिळविण्यासाठी साधना करा ॥२॥

अरे, तुला जागे करण्यासाठी त्याने प्रयत्नांची पराकाष्टा केली. आता कोनाताही प्रयत्न उपयोगाचा नाही तेव्हा झोपेतून जागा हो आणि वासुदेवाला तू आता दान डे ! ॥३॥

तुकाराम महाराज म्हणतात,  ज्या लोकांनी वासुदेवाला दान दिले, ते धान्य होत. ते सर्व पाशांतून मुक्त झाले. त्यांची जन्ममृत्यूची येरझार संपली. वासुदेवाच्या ठिकाणी ते एकरूप झाले ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा