गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४५४आहा रे भाई । गंगा नव्हे जळ

४५४

आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥१॥

समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा । संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥

काठी म्हणों नये वेतु । अन्न म्हणों नये सांतु । राम राम हे मातु । नये म्हणों शब्द हे ॥३॥

चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान । शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥४॥

गरुड नव्हे पाखरूं । ढोर नव्हे नंदिकेश्वरू । झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥५॥

कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह । ब्रम्हा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥६॥

गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड । परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥७॥

सोनें नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु । नाहीं नाहीं चर्मांतु । कृष्णजिन व्याघ्रांबर ॥८॥

मुक्ताफळें नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा । जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वइच्छेनें ॥९॥

गांव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूर्ति । तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥१०॥

कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी । तुका पांडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥११॥

अर्थ :- बंधुंनो, गंगाजल हे इतर पाण्यासारखे नसते. वड-पिपळ हे इतर वृक्षा सारखे नसतात. इतर मालेसारखे वृद्राक्ष नसते. हे सारे श्रेष्ठ आहेत. त्या भगवंताच्या प्रतिमा आहेत ॥१॥

 

समुद्र म्हणजे नधी नव्हे. शिवलिंगाला पाषाण म्हणू नये. जगातील इतर माणसांसारखे संत नसतात ॥ध्रु.॥

 

वेळूची काठी इतर काठ्यासारखी समजू नये. सातुला समान्य अन्न म्हणू नये. ‘राम’ हा शब्द इतर शब्दांसारखा समजू नये. ॥२॥

 

गरुड हा सामान्य पक्षी नाही. नांदी हा सामान्य बैल नाही. कल्पतरू हे सामान्य झाड नाही ॥३॥

 

चंद्र, सूर्य हे इतर तारांगण नव्हे. मेरू पर्वत हा इतर पावतांसाराखा समजू नये. शेष, वासुकी हे अन्य विषारी सापासारखे नाहीत ॥४॥

 

वराह अवताराला डुक्कर मानू नये. ब्रह्मदेव हा सामान्य जीव नव्हे. लक्ष्मी हि सर्वसामान्य स्त्री नव्हे ॥५॥

 

गवाक्ष हे साधे झाड नाही. वस्त्र हे कातडे नाही. परीस हा साधा दगड नाही.ते ईश्वराचे सगुण अंश आहेत ॥६॥

 

सोने हा सामान्य धातू नाही. मीठ म्हणजे रेती नाही. कृष्णाजिन-व्याघ्राबर हि नुसती चामडी नाहीत ॥७॥

 

मुक्ताफळे म्हणजे गारा नव्हेत. हिरा हा खडा नाही. स्वत:च्या इच्येनुसार बोलविता येईल असा जीव हा सोयरा नाही ॥८॥

 

द्वारका हे साधे गाव नाही. रणछोड हि इतर मुर्तीसारखी नाही. गोमती हे सामान्य तीर्थ नाही. कारण या सर्वांच्या दर्शनामुळे चित्तशुद्धी होऊन मोक्ष प्राप्त होतो ॥९॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण हा भोगी नाही. शंकर हा जोगी नाही. हा प्रसाद मला (तुकाराम महाराजांना) पान्दुरांगाजवळ मिळालेला आहे ॥१०॥

1 टिप्पणी: