गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४५५वेसन गेलें निष्काम जालें नर नव्हे नारी

सौर्यान - अभंग ११

४५५

वेसन गेलें निष्काम जालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥१॥

त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावलें घालिती गळां ॥ध्रु.॥

जन वेषा भीतें तोंडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥२॥

वेगळ्या याति पडिलों खंतीं अवघ्या एका भावें । टाकियेली चाड देहभाव जीवें शिवें ॥३॥

सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा । वाय तुंबामूढासवें भक्ति नाचों भावा ॥४॥

म्हणे तुका टाक रुका नाचों निर्लज्जा । बहु जालें सुख काम चुकलों या काजा ॥५॥

अर्थ :- प्रपंच्याचे बंधन न राहिल्यामुळे मी निशाकाम झालो. मी स्त्रीही नाही. पुरुषही नाही अशी तृतीय प्रकृती आहे. मी घरादाराचा संबंध तोडला व परपुरुषाची भेट घेतली. संतारूपी वैरीनीच्या समाजात राहू लागलो ॥१॥

 

त्या पुरुषाचा मला छंद लागला आहे. दर वेळी हरी, गोविंद अशी नामे घेण्याची गोडी लागली आहे. काही लोक आम्हाला हसतात, तर काही आमच्यावर रागावतात. कारण आम्ही लुगडे नेसतो, खांद्यावर पदर घेतो ॥ध्रु.॥

 

आमचा वेश पाहून लोक घाबरतात. माझ्या भांखोर स्वभावामुळे माझ्याशी बोलत नाहीत. भीमेच्या तीरावर कमरेवर हात ठेऊन आमचा पती, पंढरीराणा उभा आहे ॥२॥

 

एका भाव धरून आम्ही जातीतून वेगळ्या झालो. चिंता दूर झाली. जीव-शिव याचे ऐक्य झाल्यामुळे देहाभावाची चाड सोडून दिली ॥३॥

 

देहबुद्धी आणि जीवबुद्धी याहून ब्रह्मबुद्धि श्रेष्ठ आहे. आम्ही तिची सेवा करू आणि सर्व व्यर्थ आहे, हे लक्षात घेवून आमच्या धन्याबरोबर भक्तीभावाने नाचू ॥४॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही निर्लज्य होऊन धुंदपणे नाचू. आता खूप सुख झाले, सारे काम संपले ॥५॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा