गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४५३आहा रे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी

४५३

आहा रे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन ॥१॥

थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ध्रु.॥

बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकार्याीस नये दारा ॥२॥

विद्याबळें वाद सांगोनियां छळी । आणिकांसि फळी मांडोनियां ॥३॥

गांविंचिया देवा नाहीं दंडवत । ब्राम्हण अतीत घडे चि ना ॥४॥

सदा सर्वकाळ करितो चि निंदा । स्वप्नीं ही गोविंदा आठवीना ॥५॥

खासेमध्यें धन पोटासि बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं ॥६॥

तुका म्हणे नटे दावुनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावें ॥७॥

अर्थ :- बंधुंनो, या कलीयुगात जे आचारभ्रष्ट, क्रियाहीन आहेत त्यांची फजिती करणे हे माझे कार्य आहे ॥१॥

 

त्यांच्या तोंडावर थुंका. जे आपले महत्व स्वत:च सांगत बसतात, त्यांना बाहेर हाकला ॥ध्रु.॥

 

जो बायकांचा दास होऊन आईबापाचा त्याग करतो, भिकार्याला भीक वाढण्यासाठी दाराबाहेर येत नाही ॥२॥

 

विध्येच्या बळावर इतरांशी वाद घालतो व तांना त्रास देतो ॥३॥

 

गावातील देवांच्या दर्शनाला कधी जात नाही, अतिथी, ब्रह्मान याना जेऊ घालणे त्याला कधी शक्य होत नाही ॥४॥

 

नेहमी संतसज्जनांची निंदा करतो, स्वप्नातही गोविंदाचे भजन करीत नाही ॥५॥

 

मिळालेले धन जमिनीत पुरून ठेवतो व स्वत:च्या पोटाला उपाशी मारतो. दानधर्म कसा असतो, हे तर त्याला माहीतच नसते ॥६॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीचे सोंग घेऊन जो गळ्यात माला घालतो, चंदनाचा तिला लाऊन जो नटतो, परंतु गुरु, संत, देव यांच्यासमोर नम्र होत नाही, त्याच्या तोंडावर थुंका ॥७॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा