शनिवार, २२ एप्रिल, २०१७

४७०तुझें दास्य करूं आणिका मागों खावया

शेजारतीचे अभंग

गाथा अभंग ४७०

तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् जालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥

काय गा विठोबा तुज म्हणावें । थोराच्या दैवें गोड शुभअशुभ ॥ध्रु.॥

संसाराचा धाक निरंतर आम्हांसी । मरण भलें परि काय अवकळा तैसी ॥२॥

तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी । तुका म्हणे कवणा लाज हें कां नेणसी ॥३॥

 

अर्थ :- हे पंढरीराया, तुझे आम्ही दास व्हावे व पोटासाठी दुसर्याच्या तोंडाकडे पाहावे ? धिक्कार असो या अश्या जगण्याचा! ॥१॥

 

हे विठ्ठला, तुला आता काय म्हणावे बरे ? तुम्हा थोरामोठ्यांच्या दैवाने अशुभाही शुभ होते. (मग आमच्याच बाबतीत असे का?) ॥ध्रु.॥

 

प्रपंच्याचा धाक नेहमीचा आमच्या मागे लागला आहे. अशी अवकळा येण्यापेक्षा मरण आलेले बरे ! ॥२॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही तुला शरण आलो आहेत. इतरांचे शरणागत प्रसंग आल्यास त्याची लाज कोणाला आहे, हे तुम्ही जाणत नाही काय ? ॥३॥

४ टिप्पण्या: